मंचर प्रतिनिधी
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघाची १६ वी वार्षिक सभा विठ्ठल मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच संपन्न झाली. या सभेत संघाच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी वर्षातील सामाजिक व विधायक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
सभेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, आरोग्यविषयक उपक्रम, सामाजिक सहभाग आणि संघाच्या पुढील वाटचालीबाबत सदस्यांनी आपली मते व्यक्त केली. संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व स्वर्धपरीक्षेतून निवड झालेल्या मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघाच्या वतीने भक्त पुंडलिक पुरस्कार माजी प्राचार्य उत्तम आवारी व श्रावण बाळ पुरस्कार प्रकाश दामू टाव्हरे यांना देण्यात आला यावेळी संघाचे जेष्ठ सल्लागार प्रतापराव वळसे पाटील, माजी सरपंच फकिरा वळसे पाटील, उद्योजक नामदेव थोरात, सरपंच रवि वळसे पाटील,कार्याध्याक्ष दिगांबर सुडके, दत्तात्रय टाव्हरे, माजी प्राचार्य पी.आर हिंगे, हरिभाऊ वळसे पाटील, पंढरीनाथ तापकीर, विठ्ठल गवारी, सुरेश टाव्हरे प्राचार्य कांताराम टाव्हरे, सुनिल वळसे पाटील, प्रा.अरुण गोरडे, रत्नाकर कोर्हाळे, प्रसिद्ध निवेदिका मनिषा वळसे पाटील, सुनिता जाधव उपस्थित होते.
प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष बाजीराव वळसे पाटील यांनी केले, अहवाल वाचन सचिव डॉ. विलास वळसे पाटील, सूत्रसंचालन उत्तम आवारी तर आभार दामोदर ढवळे यांनी मानले.





