मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल अकरा जलसिंचन योजना उभारल्या आहेत. या योजनांसाठी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज, सोने तारण तसेच हात उसने पैसे घेऊन मोठ्या आर्थिक कष्टातून योजना पूर्ण केल्या आहेत. या योजना सुरू झाल्या आहेत मात्र या योजनांना सध्या सौरऊर्जेवर आधारित वीज पुरवठा करण्यात आला असून, पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी ओलीताखालील क्षेत्र कमी आले असून उत्पादनात घट झाली आहे.
त्यामुळे धामणी परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर धामणी येथील शेतकऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे थेट वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धामणीच्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच त्यांनी ऊर्जा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरात लवकर वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.

यासंदर्भात दि. २२ रोजी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना स्थळावर संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस धामणी, पहाडदरा परिसरातील शेतकरी, महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच जैन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आमदार वळसे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
धामणी परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी जि.प. सदस्य विष्णू हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज, धामणी सरपंच प्रतिक्षा जाधव, जारकरवाडी सरपंच प्रतीक्षा बढेकर, उपसरपंच सचिन टाव्हरे, संबंधित विभागाचे अधिकारी धामणी, पहाडदरा येथील शेतकरी उपस्थित होते.





