मंचर प्रतिनिधी
राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाकडून शेती पिकांचे पंचनामे एकत्रितपणे सुरू करण्यात आले आहेत. यानंतर शासनाकडून निश्चित मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जमाफीची घोषणा होऊनही प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित फायदा झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्यातील विविध भागांतील शेतकरी करू लागले आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे.

कृषी व महसूल विभागाकडून संयुक्तपणे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई दिली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले





