मंचर प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) निरगुडसर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ग्राम अभियान व भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
यावेळी सतीश मोटे यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिंडोरी प्रणित मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले. “दत्तप्रणालीमध्ये ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के अध्यात्म या तत्त्वावर कार्य केले, तर समाज आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय साधता येतो,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही उपस्थिती राहुन मार्गदर्शन केले. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम केल्यास खऱ्या अर्थाने अध्यात्मिक समाधान मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, निरगुडसर यांच्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास सभागृह उभारणीसाठी २० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
या सोहळ्यात पालखी प्रस्थान, नामघोष, आरती व प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतल्याने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
यावेळी जिल्हा प्रतिनिधी अशोक जाधव, विजय कुलकर्णी मधु रोकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





