नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी – देवदत्त निकम
मंचर प्रतिनिधी
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी वेळेतच आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांनी केले. पारगाव कारखाना परिसरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी, पारगाव, शिंगवे, लाखनगाव, लोणी आदी गावांमध्ये अलीकडच्या काळात अनेक नागरिकांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांनी वेळेतच आरोग्य तपासण्या करून घेतल्यास भविष्यात गंभीर आजारांमुळे होणारा मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो. सध्या कॅन्सरसारख्या महाभयंकर आजाराचे प्रमाण वाढत असून, विशेषतः महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता नियमित तपासण्या करून योग्य उपचार घेतल्यास आयुष्य निरोगी आणि सुखकर जगता येईल, असेही निकम यांनी सांगितले.
दैनंदिन वाढत्या उष्णतेमुळे तापमान सध्या ४० डिग्रीच्या पुढे जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये उष्माघाताचा धोका जाणवू शकतो.
ग्रामीण भागात शेतकरी वर्ग असल्याने बऱ्याच वेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं परंतु असं न करता नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासण्या करणे गरजेचे आहे
उन्हाची तीव्रता वाढत चालली असून नागरिकांनी शेतात काम करताना किंवा दुचाकी वर प्रवास करताना डोक्यावर पांढरे उपरणे ओले करून, बांधावे, तहान लागलेली नसले तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हाच्या तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर कामानिमित्त पडावे, हलकी पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत प्रौढांमध्ये साधारणतः तीव्र डोकेदुखी, मळमळने उलटीचा भास होणे, चक्कर येणे हृदयाचे ठोके वाढणे, छातीमध्ये धडधड होणे व लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार देणे. लघवीचे कमी झालेले प्रमाण कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे तोंडाच्या तेथील त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉ. शुभम रोडे,
समुदाय आरोग्य अधिकारी,
जारकरवाडी उपकेंद्र





