Home गावागावातुन पूर्व आंबेगावात पिकांची होरपळ, शेतकरी संकटात, पंचनाम्यासाठी शासनाला साकडे 

पूर्व आंबेगावात पिकांची होरपळ, शेतकरी संकटात, पंचनाम्यासाठी शासनाला साकडे 

0
पूर्व आंबेगावात पिकांची होरपळ, शेतकरी संकटात, पंचनाम्यासाठी शासनाला साकडे 
मंचर प्रतिनिधी  
पूर्व आंबेगावात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने जिरायती भागातील खरीप पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, धामणी, पहाडदरा व शिरदाळे परिसरातील शेती पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी आणि नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी वडगावपीर येथील रमेश आदक पाटील, पहाडदरा येथील विनोद वायकर, शिरदाळे येथील जयदीप चौधरी या शेतकऱ्यांनी केली आहे 
पूर्व आंबेगावातील जिरायती भागात दरवर्षी खरीप हंगामात बाजरी, मका, भुईमूग, बटाटा, तूर, सोयाबीन मुग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकू लागली आहेत. विशेषतः शिरदाळे परिसरातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. बटाटा लागवडीसाठी केलेला भांडवली खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास आगामी काळात या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. शेतीचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अशा तिहेरी संकटाचा सामना पूर्व भागातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळ न दवडता महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे शेती पिकांची पाहणी करावी, नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पूर्व आंबेगावातील शेतकरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here