spot_img
spot_img
spot_img

पावसाने ओढ दिल्याने शिरदाळे परिसरात खरीप हंगाम धोक्यात सोयाबीनसह इतर पिके पावसाअभावी सुकली; पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे, धामणी, लोणी, पहाडदरा, मांदळवाडी व वडगावपीर परिसरात पावसाने गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे या परिसरात जवळपास १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या सोयाबीनसह बटाटा, वाटाणा, मूग, उडीद तसेच इतर खरीप पिके ऐन वाढीच्या अवस्थेत आहेत. काही पिकांना फुलोरा आला असून काही पिके फळधारणेच्या अवस्थेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा ताण बसला आहे. अनेक ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाली असून उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शिरदाळे परिसर पूर्वी बटाटा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखला जात होता. मात्र, सध्या बटाटा लागवडीचे क्षेत्र घटून केवळ १० ते १५ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात कल आहे. परंतु पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनचे पीकही संकटात सापडले आहे.

पावसाअभावी केवळ पिकांचाच प्रश्न निर्माण झाला नसून जनावरांच्या चाऱ्याची अवस्थाही बिकट झाली आहे. रानातील चारा वाळल्याने दुभती जनावरे दूध उत्पादनात घट देत आहेत. त्यामुळे शेतीसोबतच दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत माऊली डेअरीचे चेअरमन अनिकेत चौधरी, भूपेंद्र तांबे, शुभम तांबे तसेच अमूल डेअरीचे चेअरमन संतोष तांबे, निवृत्ती तांबे यांनी चिंता व्यक्त केली.

पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या काही क्षेत्रांतील पिकांचे जवळपास ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाऊस आणखी लांबल्यास उर्वरित पिकेही हातातून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

पावसाची प्रतीक्षा, दुबार पेरणीचे संकट

शिरदाळे परिसरातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होतो. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या; मात्र आता पावसाने दीर्घ ओढ दिल्याने पिकांसोबत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. काही भागात झालेली ज्वारीची पेरणीही पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता असून, पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते.
मयूर सरडे, माजी उपसरपंच, शिरदाळे

Related Articles

ताज्या बातम्या