मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथे श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीमुळे गावातील वातावरण उत्साहमय झाले होते.
बैलपोळ्यानिमित्त महिलांनी सजवलेल्या बैलांचे औक्षण करून त्यांची विधिवत पूजा केली. तसेच बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवून शेतकरी कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली. शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांप्रती आदर आणि ऋण व्यक्त करण्याची ग्रामीण भागातील ही पारंपरिक प्रथा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे.
दरम्यान, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झाल्यामुळे ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला असून शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे गावोगावी बैलांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. मात्र, ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचा छंद मोठ्या प्रमाणात जोपासला जात असल्याने अनेक शेतकरी आजही बैलांचे संगोपन आवडीने करीत आहेत.
बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून मिरवणुकीत सहभागी केले. पारंपरिक वेशभूषा, सजवलेले बैल आणि महिलांकडून करण्यात आलेले औक्षण यामुळे काठापूर बुद्रुक येथे श्रावणी बैलपोळा सणाचा उत्साह पाहायला मिळाला.





