मंचर प्रतिनिधी
हवामानातील सातत्याने होणारे बदल, वाढता उत्पादन खर्च, पाण्याची उपलब्धता आणि शाश्वत शेतीची वाढती गरज लक्षात घेता ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर आता काळाची गरज बनली आहे. मृदा व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ही ऊस उत्पादनवाढीची त्रिसूत्री असून, या तिन्ही बाबींचे अचूक आणि शास्त्रीय नियोजन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करणे शक्य आहे. त्यामुळे एकरी १५० टनांपर्यंत ऊस उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस विकास शास्त्रज्ञ अशोक कडलक यांनी केले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने निरगुडसर येथील मेंगडेवाडी फाटा परिसरातील मोरया मंगल कार्यालयात ‘ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर व विकास मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अशोक कडलक बोलत होते.
कडलक म्हणाले की, बदलत्या हवामानाचा ऊस पिकावर मोठा परिणाम होत असून, पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनेक वेळा पाणी, खते आणि इतर निविष्ठांचा अनावश्यक वापर होतो. यामुळे उत्पादन खर्च वाढण्याबरोबरच जमिनीची सुपीकता आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांवरही परिणाम होतो. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतातील मातीची स्थिती, पिकाची गरज, हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता आणि खतांची आवश्यकता यांचा अभ्यास करून त्यानुसार निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर साध्य करता येऊ शकतो.
ऊस उत्पादन वाढविण्यासाठी केवळ अधिक पाणी किंवा अधिक खत देणे हा उपाय नसून, पिकाच्या गरजेनुसार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात निविष्ठांचा वापर करणे आवश्यक आहे. AI आधारित तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या विविध टप्प्यांवर अचूक मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि एकूण उत्पादकता वाढविण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे अभिनंदन पाटील, आकाश वळकुंदे, परिमल गिरी, विजय आंग्रे, सुरेश मगडुम तसेच प्रगतिशील महिला शेतकरी मनीषा निघोट यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान, पिकाच्या वाढीसाठी आवश्यक बाबी, उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि ऊस उत्पादनात भरीव वाढ व्हावी, यासाठी कारखान्याच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रति शेतकरी सुमारे २५ हजार रुपयांचा खर्च वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संयुक्तपणे उचलणार आहेत. यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून १८ हजार २५० रुपये, तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून ६ हजार ७५० रुपये अनुदान दिले जाणार आहे.
ही योजना एकूण ३ हजार शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असून, आतापर्यंत २ हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित १ हजार शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदीप वळसे पाटील यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसोबतच उत्पादन खर्च कमी करण्यावरही भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी बाळासाहेब घुले, पुष्पलता जाधव, बाबासाहेब खालकर, आनंदराव शिंदे, रामचंद्र ढोबळे, प्रिया वानखेडे, शांताराम बापू हिंगे, मच्छिंद्र गावडे, विलास लबडे, माऊली अस्वारे, सीताराम लोहोट, रमेश खिलारी, संजय गोरे तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांच्यासह शेतकी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक भोर यांनी केले, तर आभार कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढगे यांनी मानले.





