मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून घडत असलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनांचा छडा लावत पारगाव कारखाना पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींकडून पल्सर मोटारसायकल, साडेसहा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १० लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २७ मे २०२६ रोजी मौजे खडकवाडी हद्दीत सिंधुबाई बाळू घाडगे (वय ६५, रा. गडकवाडी, ता. खेड, जि. पुणे) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दोन अज्ञात चोरट्यांनी पल्सर मोटारसायकलवर येऊन हिसकावून नेले होते. याप्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग आणि चंद्रकांत गव्हाणे यांनी खडकवाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. आरोपींनी चेहऱ्यावर मास्क व डोक्यावर टोपी घातल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड होते. विविध मार्गांवरील तब्बल १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयाची सुई शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाकडे वळली.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अजय देवकर उर्फ भोऱ्या (रा. देवकरवस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर) याची ओळख पटली. त्याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यात सोन्याचे दुकान लुटीचा तसेच शिरूर पोलीस ठाण्यात खून व खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.
पोलीस पथक आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले असता त्याने शेतातून पळ काढला. मात्र पोलीस अंमलदार संजय साळवे व मंगेश अभंग यांनी सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने त्याचे साथीदार ओंकार शेंडगे (रा. डोंगरगण, ता. शिरूर) व आतिश दिलीप गव्हाणे (रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्या मदतीने विविध ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
या टोळीने पारगाव कारखाना, रांजणगाव एमआयडीसी, शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण आठ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, अमोल वडेकर तसेच पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे आणि पोलीस मित्र रामदास वाळुंज यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





