मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, वडगावपीर आणि मांदळेवाडी परिसरात यंदा अत्यल्प पाऊस, वाढते तापमान आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी धामणीचे सरपंच प्रतीक्षा जाधव, पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, शिरदाळे माजी उपसरपंच मयुर सरडे, वडगावपीर माजी सरपंच संजय पोखरकर मांदळेवाडी उपसरपंच रवींद्र ढगे पाटील लोणीचे सामाजिक कार्यकर्ते बाळशिराम वाळुंज यांनी केली आहे.
या परिसरात जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. तलाव, नाले, विहिरी तसेच बोअरवेल कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही मोठी समस्या निर्माण झाली आहे. बागायती क्षेत्रातही हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असून पशुपालक हवालदिल झाले आहेत.
लोणी-धामणी परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह दूध व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र चारा आणि पाण्याअभावी जनावरांचे संगोपन करणे कठीण झाले असून दूध उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जनावरे जगली तरच शेतकरी टिकेल आणि शेतकरी टिकला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम राहील, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, वडगावपीर आणि मांदळेवाडी येथे तातडीने चारा डेपो सुरू करून पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच या भागाची पाहणी करून दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचीही मागणी पुढे येत आहे.





