पुणे प्रतिनिधी
नव्याने सुरू होत असलेल्या पुणे–मुंबई ‘मिसिंग लिंक’ मार्गास शिंग्रोबा धनगर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान करण्यात यावा, अशी मागणी जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील प्राध्यापक सुनील कापडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सन १८१८ ते १८५४ या कालावधीत इंग्रजांच्या राजवटीत रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू होते. दक्षिण व उत्तर भारताला व्यापाराच्या दृष्टीने जोडण्यासाठी योग्य मार्गाचा शोध घेतला जात होता. त्यावेळी शिंग्रोबा धनगर यांनी सह्याद्रीच्या अतिशय किचकट, खडतर आणि दुर्गम भागातून पुणे–मुंबई दरम्यानचा मार्ग इंग्रजांना दाखवून दिला. त्यामुळे आजचा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते.
माहितीनुसार, इंग्रजांनी त्यांच्या कार्याबद्दल बक्षीस म्हणून काय हवे, अशी विचारणा केली असता त्यांनी “आम्हाला स्वातंत्र्य हवे” अशी मागणी केली. त्यांच्या या धाडसी उत्तरामुळे इंग्रजांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्याची माहिती सांगितली जाते.
अशा या धाडसी व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ पुणे–मुंबई ‘मिसिंग लिंक’ मार्गास त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
संबंधित मार्गास “स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर मार्ग” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे.





