मंचर
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याने हरवलेल्या मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. मार्च २०२६ महिन्यात पोलीसांनी एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचे १२ हरवलेले मोबाईल शोधून काढत ते मूळ तक्रारदारांना परत केले.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (खेड विभाग) अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पारगाव (का.) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी विशेष पथक तयार करून हरवलेले मोबाईल शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस अंमलदार मंगेश अभंग आणि संजय साळवे यांनी सीईआयआर पोर्टल व अन्य तांत्रिक साधनांचा वापर करून मोबाईल शोध मोहीम राबवली.
शोधून काढलेले सर्व मोबाईल पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. ही मोहीम पुढेही सातत्याने राबवली जाणार असल्याचे स.पो.नि. कांडगे यांनी सांगितले.
दरम्यान, पारगाव (का.) पोलीस ठाण्याने सन २०२५-२०२६ या कालावधीत आतापर्यंत एकूण ३७ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत देण्यात यश मिळवले आहे. या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांकडून पोलीसांचे कौतुक होत आहे.





