मंचर प्रतिनिधी
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामामध्ये ८ लाख ८३ हजार ६९ मे.टन ऊस गाळप करून ९ लाख २७ हजार १९७ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता करण्यात आली. हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी आभार व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने तसेच अधिकारी व कर्मचा-याच्या नियोजनाने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातून नोंद असलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करून ८ लाख ८३ हजार ६९ मे.टन ऊस गाळप करुन ९ लाख २७ हजार १९७ साखर पोत्यांचे उत्पादन केले असून गाळप हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार आणि मजूर यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामात १५ फेब्रुवारी अखेर गाळप केलेल्या ऊसासाठी ऊस उत्पादक शेतक-यांना एफ.आर.पी. प्रमाणे रु. ३,२७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रुपये २८० कोटी अदा केले आहेत.
भीमाशंकर कारखान्यामार्फत “दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” हि महत्वकांक्षी योजना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु. यांचे मार्गदर्शनाखाली राबवीत असून योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतक-यांना प्रशिक्षण, माती व पाणी परीक्षण सुविधा, उधारीवर ताग व ऊस बेणे वाटप, ऊस रोपवाटिका, खाजगी ऊस लागवड व ठिबक सिंचन अर्थसहाय्य, उधारीवर द्रवरूप जीवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव संजीवक, ह्युमिक अॅसिड, जैविक किड नियंत्रण, इपीएन, रासायनिक खते व औषधे, पाचट कुट्टी इ. पुरवठा केला जातो.
उधारीवर व कमी खर्चामध्ये ड्रोन फवारणीची सुविधा तसेच स्वंतत्र ऊस विकास विभागाची स्थापना करून ऊस उत्पादक शेतक-यांना कर्मचा-यामार्फत ऊस पिकाबाबत अद्यावत माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. तरी ऊस उत्पादक शेतक-यांनी योजनेतील सुविधांचा लाभ घेवून ऊस लागवडीवर व उत्पादन वाढीवर भर द्यावा असे आवाहन केले.
सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांना दिल्या जाणा-या अधुनिक सोईसुविधा व सतत वेळेवर दिलेल्या योग्य दरामुळे कारखान्याने मिळविलेल्या विश्वासाच्या जोरावर यशस्वी वाटचाल सुरु आहे असे कारखान्याचे चेअरमन बेंडे यांनी सांगितले.





