मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, देवगाव, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, बडेकरमळा, काठापूर, वाळुंजनगर आदी परिसरात कांदा लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. यंदा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढली असून, शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
गेल्या महिनाभरापासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतशिवारांमध्ये कांदा लागवडीची लगबग सुरू असून, शेतकऱ्यांची शेतीकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
मात्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. उपलब्ध मजुरांकडून अधिक मजुरीची मागणी होत असल्याने लागवडीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे मजूरटंचाईवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी ‘सावड’ पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.
दरम्यान, कांदा लागवडीच्या काळात वीजपुरवठ्यात वारंवार होणाऱ्या लंपडावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.





