मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर मंडळ कार्यक्षेत्रात विविध शासकीय कृषी योजनांतर्गत देण्यात आलेल्या लाभांची पाहणी करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
या दौऱ्यात अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके, कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मग्रारोहयो) फळबाग लागवड तसेच पीएमएफएमई योजनेंतर्गत अनुदान प्राप्त लाभार्थी यांच्या कामांची पाहणी करण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांविषयी माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांना पीक उत्पादन, कृषी तंत्रज्ञान आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या ‘बलवान’ या संकरित बाजरी वाणाबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावर्षी या वाणामुळे बाजरीचे उत्पादन विक्रमी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी विविध योजनांतून मिळालेल्या लाभांचे अनुभव सांगत कृषी विभागाच्या योजनांबाबत समाधान व्यक्त केले.
या पाहणी दौऱ्यास तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव, उपकृषी अधिकारी अरुण जोरी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण मिरके व विकास गवई उपस्थित होते.





