spot_img
spot_img
spot_img

मांदळेवाडीत विजेचा लंपडाव सुरूच; ग्रामस्थ त्रस्त

मंचर प्रतिनिधी

लोणी (ता. आंबेगाव) : मांदळेवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरूच असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठ्याच्या या समस्येमुळे घरगुती कामांसह शेतीच्या कामांवरही परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मांदळेवाडी परिसरातील दहापोलवरून चोरीला गेलेल्या वीजतारांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने वीजपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सध्या मांदळेवाडीला रांजणगाव (ता. शिरूर) येथून वीजपुरवठा केला जातो. मात्र, या मार्गामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

त्यामुळे मांदळेवाडीला लोणी (ता. आंबेगाव) येथून वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लोणी येथून वीजपुरवठा केल्यास परिसरातील वीज समस्या काही प्रमाणात कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असून, “मांदळेवाडीचा वीज प्रश्न सुटणार तरी कधी?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरणने या समस्येची तातडीने दखल घेऊन दहापोल येथील चोरीला गेलेल्या वायरचा शोध घेण्याबरोबरच लोणी येथून वीजपुरवठा करण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या