मंचर प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने आंबेगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मूर्ती साकारण्याच्या कामाला वेग आला आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत असून, मूर्तींचे रंगकाम, सजावट, वस्त्रांची नक्षी आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा पीओपीबरोबरच पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तींनाही मोठी मागणी असल्याचे मूर्ती कारागीर श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू (गावडेवाडी, ता. आंबेगाव) यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील विविध गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. आकर्षक रंगसंगती, पारंपरिक स्वरूप, विविध अलंकार व सजावटीमुळे मोठ्या मूर्ती मंडळांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीसाठी नागरिकांनी आगाऊ बुकिंग सुरू केले असून, ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती तयार करून दिल्या जात आहेत.
मोठ्या मूर्तींना विशेष मागणी
गावडेवाडी येथील कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
त्यातील अनेक मूर्ती ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करण्यात आल्या आहेत. दहा हजार ते पंचवीस हजार रुपये किमतीच्या मोठ्या गणेशमूर्तींना गणेश मंडळांकडून विशेष मागणी असून, घरगुती गणेशमूर्तींनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाडूच्या मूर्तींना यंदा मागणी वाढल्याचेही प्रथमेश राजगुरू यांनी सांगितले.
पीओपी मूर्तींना पसंती;
आकर्षक रंगसंगती ठरतेय विशेष आकर्षण
कमी वजन, आकर्षक आकार आणि तुलनेने परवडणारी किंमत यामुळे पीओपीच्या गणेशमूर्तींना ग्रामीण भागातही मोठी मागणी आहे. प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी पीओपीच्या मूर्तींची मागणी कायम असल्याचे मूर्ती कारागीर श्रीधर राजगुरू यांनी सांगितले.
दरम्यान, कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ तसेच मजुरी वाढल्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे राजगुरू यांनी सांगितले. दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडून जलप्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेऊन शाडूच्या व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.





