मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील इ.टी.पी. परिसरातील साचलेला गाळ व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावता ते बाहेर सोडून परिसर दूषित केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गंगाधर ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०२५-२६ च्या गळीत हंगामानंतर इ.टी.पी. परिसरातील गाळ काढून साफसफाई करण्याचे काम ठेकेदार दीपक एकनाथ करंडे यांना देण्यात आले होते. मात्र, करारातील अटी व पर्यावरणीय नियमांचे पालन न करता ३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अनट्रीटेड तलावातील पाणी व गाळ बाहेर सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे गाळमिश्रित पाणी नैसर्गिक नाल्यात वाहून गेल्याने परिसर दूषित झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कारखाना प्रशासनाने संबंधितांविरुद्ध पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित बापूसाहेब मदके यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.





