मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील गावांतर्गत येणाऱ्या मखरवस्ती व पडवळवस्ती येथील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली होती. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होऊन ग्रामस्थांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज आणि पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चातून संबंधित रस्त्यांचे मुरुमीकरण करून वाहतुकीसाठी ते सुरळीत केले.
या कामामुळे मखरवस्ती व पडवळवस्तीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, पोंदेवाडीतील इतर वाड्या-वस्त्यांवरील काही रस्त्यांनाही मुरुमीकरणाची आवश्यकता असून, त्या ठिकाणीही टप्प्याटप्प्याने स्वखर्चातून मुरुमीकरण करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी दिली.





