मंचर प्रतिनिधी
वडगावपीर (ता. आंबेगाव ) येथे. (दि. २ ऑगस्ट ) रोजी पोखरकर मळा क्रमांक १ व २ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थ व पाहुण्यांवर अचानक आग्या मधमाशांच्या मोहोळाने हल्ला चढवल्याने एकच गोंधळ उडाला. या अनपेक्षित घटनेमुळे काही काळासाठी मृतदेह जागेवरच ठेवून उपस्थितांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढावा लागला.
जवंताबाई निवृत्ती पोखरकर यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच स्मशानभूमी परिसरातील आग्या मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि उपस्थितांवर तुटून पडले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे स्मशानभूमीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.नागरिक व पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अंकूश पोखरकर, खंडू पोखरकर, ज्ञानेश्वर पोखरकर, विजय पोखरकर, बाबूराव पोखरकर, महादू पोखरकर, नवनाथ वाळूंज यांच्यासह इतर काही ग्रामस्थ व पाहुणे मधमाशांच्या दंशामुळे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच संजय पोखरकर व माजी उपसरपंच अण्णा पोखरकर यांनी तातडीने धाव घेऊन जखमींना लोणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर स्मशानभूमी परिसरातील आग्या मधमाशांचे मोहोळ तातडीने हटविण्यात यावे, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





