मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील बोऱ्हाडे मळा परिसरात बुधवार ( दि.८ ) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला उचलून नेल्याची घटना घडली आहे . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धामणी येथील संदीपआण्णा बोऱ्हाडे यांच्या घराजवळ हा प्रकार घडला. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे अस्मिता शिंदे, बिबट शिघ्र कृती दल तसेच गावडेवाडी येथील बेस कॅम्पचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर परिसराची पाहणी करून नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी धामणी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई राजेंद्र जाधव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका सरचिटणीस भाऊसाहेब करंडे, किरण गाढवे, पंडित जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
वनविभागाने नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडावे व जनावरांची सुरक्षितता व्यवस्थित करावी बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाने केले आहे





