मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे निरगुडसर पारगाव शिंगवे नागापूर काठापूर बुद्रुक लाखणगाव देवगाव पोंदेवाडी जारकरवाडी लोणी धामणी या भागात मुसळधार पाऊस बरसला असून बेल्हा जेजुरी महामार्ग लाखणगाव नजीक पाण्याखाली गेला होता त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता व काही काळ वाहतूक ठप्प झाली होती
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील शिवराम नाथा पोखरकर व आकाश धोंडीभाऊ पोखरकर यांची घरे पाण्याखाली गेल्याची घटना घडली आहे.

या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.
पोखरकर यांची घरे पावसाच्या पाण्याने वेढली गेल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले. लाखणगावजवळील बेल्हा–जेजुरी मार्ग काही काळ पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच लोणी–वाफगाव मार्गावरील शिरदाळे नजीकच्या शिकोबा घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच नदी, ओढे व घाट परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे
दरम्यान, महसूल व कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज तसेच पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.





