मंचर प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन समिती, तालुका खालापूर जिल्हा रायगड मूल्यमापन समिती यांनी पहाडदरा गावाला भेट देत गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी गावातील स्वच्छता, मूलभूत सुविधा, ग्रामविकासासाठी सुरू असलेले उपक्रम तसेच ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग पाहून समितीने समाधान व्यक्त केले.
गावामध्ये विकासकामे राबविताना ग्रामस्थांचा सहभाग आणि स्थानिक प्रतिनिधींचे नियोजनबद्ध काम विशेष उल्लेखनीय असल्याचे समितीने नमूद केले. विशेषतः संकेत वायकर यांच्या कार्यपद्धतीचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
MBA व B.Sc. Agriculture सारखे उच्च शिक्षण घेतलेले संकेत वायकर हे गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या वागण्या-बोलण्यातून गावाबद्दलची आत्मीयता आणि विकासाची तळमळ दिसून येते, असे गौरवोद्गार श्री. संदीप कराड BDO पंचायत समिती, खालापूर यांनी काढले. “अशा अभ्यासू, होतकरू असलेल्या युवकाचा फायदा संपूर्ण गावाने करून घ्यायला हवा,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पहाडदरा गावामध्ये लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे गाव विकासाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
यावेळी सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, ग्रामपंचायत सदस्य संकेत वायकर, दीपक कडाळे, कविता कडाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान वाघ, सहाय्यक गट विकास अधिकारी इंदे मॅडम, मूल्यमापन समिती सदस्य व पंचायत समिती आंबेगाव चे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





