मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सूर्यकांत भिकाजी दळे यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे एक ते दीड वर्ष वयाची मादी बिबट्या पडल्याची घटना आज उघडकीस आली. विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पोत्रे, रेस्क्यू टीम सदस्य तसेच बेस कॅम्पचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू करत अत्यंत सावधगिरीने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
वनविभागाच्या माहितीनुसार, हा मादी बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्ष वयाचा असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. आवश्यक तपासणीसाठी त्याला सुरक्षितरित्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली.
या घटनेमुळे नागापूर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याला जीवदान मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.





