spot_img
spot_img
spot_img

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकास १० हजारांचा दंड पारगाव कारखाना पोलिसांची कारवाई वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

 

मंचर प्रतिनिधी

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात पारगाव कारखाना पोलीस ठाण्याने कडक कारवाई करत एका वाहनचालकास १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (खेड विभाग) अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस ठाणे हद्दीत अपघात प्रतिबंधासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अंमलदार गणेश जोरी यांनी अपघातप्रवण ठिकाणांची ओळख पटवून कारवाई सुरू केली.
२४ एप्रिल २०२६ रोजी रोडेवाडी फाटा येथे अष्टविनायक राज्य महामार्गावर वाहतूक तपासणीदरम्यान अमरजीत इंद्रपाल (रा. शिरूर, जि. पुणे) हा मद्यप्राशन करून चारचाकी वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले.
त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर त्याच्याविरुद्ध पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस हवालदार देवानंद किर्वे यांनी तपास पूर्ण करून २८ एप्रिल २०२६ रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या कारवाईत पोलीस अंमलदार प्रशांत जगताप, वॉर्डन प्रमोद दिवेकर तसेच पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या