मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची ( दि. २३ ) रोजी मासिक बैठक पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे पार पडली. परिसरात वाढत्या चोरी व दरोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सुरक्षा उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी पोलिस पाटलांना केले
तसेच सर्व पोलीस पाटील यांना गावपातळीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक गावात ‘ग्राम सुरक्षा दल’ स्थापन करून दररोज रात्री किमान पाच जणांच्या पथकाद्वारे प्रभावी रात्र गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच, गावात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले.
यामुळे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे अधिक सुलभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, गावातील एकटे राहणारे वयोवृद्ध महिला व पुरुष यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना देणे, तसेच त्यांना पोलीस, बीट अंमलदार आणि पोलीस पाटील यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीमुळे गावांमध्ये सुरक्षेची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.





