मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, खडकवाडी, पारगाव, शिंगवे आदी गावांमध्ये उन्हाळी बाजरीचे पीक फुलोऱ्यात आले आहे. बाजरीचे पीक चांगले उत्पन्न देणारे असल्याने या परिसरातील शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात बाजरीचे पीक घेत आहेत.
या वर्षी पाऊस चांगला पडल्याने डिंभे धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे. डिंभे धरणातून उजवा व डावा कालवा तसेच गोड नदीला शाश्वत पाणी उपलब्ध होत असल्याने कालव्या आणि नदीच्या किनाऱ्यावरची अनेक गावे उन्हाळ्यात बाजरीचे पीक घेत आहेत.
उन्हाळ्यात स्वच्छ व दमदार हवामान असल्यामुळे बाजरीचे पीक जोरदार येत असून उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात.
उन्हाळी बाजरीची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना खुरपणी, खतपाणी आणि पक्ष्यांपासून निगा राखावी लागते.
पाणी मुबलक प्रमाणात मिळाल्यामुळे यंदा बाजरीचे पीक जोरदार आले आहे. बाजरीच्या कणसांचे आकार मोठे असून, दाणे टपोरे आहेत. यामुळे बाजरीच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असे बाजरी उत्पादक शेतकरी सांगत आहेत.





