मंचर प्रतिनिधी
रोडेवाडी (ता. आंबेगाव) हद्दीत अक्षदा हॉटेलच्या बाजूला पत्राशेडच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत पाच जणांकडून ६६ हजार ३०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२.२० वाजता ही कारवाई करण्यात आली. सावकार गोविंद भोर (वय ४२, रा. कवठे यमाई, ता. शिरूर), नामदेव दादाभाऊ जाधव (वय ५२, रा. पोंदेवाडी), संतोष बाळू पोखरकर (वय ४४, रा. देवगाव), नाथा बबन किटे (वय ४२, रा. संविदणे, ता. शिरूर) आणि सचिन मारुती साकोरे (वय ४०, रा. पोंदेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असताना आढळून आल्या.
त्यांच्याकडून रोख ६६,३०० रुपये तसेच ५२ पानांचा पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बबन गाढवे यांनी फिर्याद दिली असून पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०२/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार डामसे हे दाखल अंमलदार असून पोलीस हवालदार मडके पुढील तपास करीत आहेत.





