मंचर प्रतिनिधी
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना घरगुती गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोणत्याही गॅस वितरण कंपनीमार्फत नवीन गॅस कनेक्शन देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी आंबेगावचे तहसीलदार राहुल सारंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ऊसतोड कामगार, मजूर रोजगारासाठी येत असतात. याशिवाय जिल्हा परिषद शिक्षक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, कारखान्याचे कामगार, विविध समाजांतील कष्टकरी कुटुंबे तसेच स्थानिक नागरिक या परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र, घरगुती गॅस वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
या समस्येबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर गॅस वितरण कंपनीने तत्काळ दखल घेत गॅस सिलिंडर वितरणाचा प्रतीक्षा कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवसांवर आणला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागातून गॅस वितरण कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
दरम्यान, सध्या नवीन गॅस कनेक्शन देण्याची प्रक्रिया बंद असल्याने अनेक नागरिकांना नवीन जोडणी मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच गॅस वितरणावेळी ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी पाठविला जातो. मात्र, मोबाईल रिचार्ज नसणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे ओटीपी वेळेत प्राप्त होत नसल्याने सिलिंडर वितरणात अडथळे निर्माण होत आहेत.
पारगाव परिसरातील नागरिकांची गॅसची गरज लक्षात घेता नवीन गॅस कनेक्शन सुरू करण्याबरोबरच ओटीपी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विठ्ठल ढोबळे यांनी निवेदनातून केली आहे
यावेळी नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ, पुरवठा निरीक्षण, अधिकारी माधुरी संतोषवार, विलास बोराटे, गणपत ढेरंगे, खंडू कोकणे, किरण थोरात, स्वप्नील लोखंडे आदी उपस्थित होते.





