मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील विकास सोसायटीने ४९५ सभासदांना पुणे जिल्हा बँकेमार्फत खरीप हंगामासाठी ४ कोटी १२ लाख ५० हजार ५०० रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन खंडू भोजने व सचिव नवनाथ मंचरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ संदर्भातील परिपत्रक अद्याप विकास सोसायट्यांना प्राप्त झालेले नसल्यामुळे सभासद व कर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे संस्थेच्या वसुलीच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’चे परिपत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी संस्थेचे चेअरमन खंडू भोजने व उपाध्यक्ष बाळासाहेब लबडे यांनी केली आहे.
माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड व विकास अधिकारी के. आर. वाळुंज यांच्या प्रयत्नांतून सभासदांना खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे आजी-माजी संचालक व कर्मचारी उपस्थित होते.





