मंचर (प्रतिनिधी)
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध शेतकऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, थोरांदळे येथील पाईन मळा परिसरात राहणारे दामोदर जयराम मिंडे (वय ६२) हे घरात एकटेच झोपलेले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी मिंडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा किंवा त्यांना निष्क्रिय करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केले. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना उघडकीस येताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती. घरातील काही ऐवज चोरीस गेला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसली तरी प्राथमिक तपासात दरोड्याचा हेतू असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस पाटील वैशाली टेमगिरे यांनी तत्काळ मंचर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीसांनी घटनास्थळाचा बारकाईने तपास सुरू केला असून चोरीस गेलेल्या वस्तूंची माहिती गोळा केली जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरात गस्त वाढवण्यात आली असून, आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. काही संशयितांच्या हालचालींबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या निर्घृण घटनेमुळे थोरांदळे व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडे चोरी व दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.





