spot_img
spot_img
spot_img

लोणी-धामणी परिसर दुष्काळग्रस्त जाहीर करा पूर्व आंबेगावातील पहाडदरा , शिरदाळे, धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी येथील शेतकऱ्यांची मागणी;

 

मंचर प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून शासनाकडून विचार करण्यात आला असताना आंबेगाव तालुक्याचा समावेश न झाल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर व मांदळेवाडी या गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने या गावांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे, अशी मागणी वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर, मांदळेवाडी सरपंच उज्ज्वला आदक, लोणी सरपंच सावळेराम नाईक, धामणी सरपंच प्रतिक्षा जाधव, पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, शिरदाळे सरपंच सुप्रिया तांबे यांनी केली.

या परिसराला घोडनदीच्या पाण्याचा पुरेसा लाभ मिळत नसून डिंभे उजव्या कालव्याचे पाणीही अनेक भागांतील शेतीपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास खरीपाबरोबरच रब्बी हंगामातील पिकांवरही त्याचा मोठा परिणाम होतो.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाची अनिश्चितता कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप पिके कशीबशी हातात येत असताना रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेला दमदार पाऊस लांबणीवर पडल्याने ज्वारीसह अन्य रब्बी पिकांच्या पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शासनाने गावनिहाय परिस्थिती तपासावी
दुष्काळ जाहीर करताना पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता, सिंचनाची साधने, पीकपाणी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील परिणाम या सर्व बाबींचा वस्तुनिष्ठ विचार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे आंबेगाव तालुक्याचा संपूर्णपणे दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला नसला, तरी पूर्व भागातील प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन पात्र गावांना दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : पाणी नाही, मग दुष्काळाची नोंद तरी करा!

शेजारील तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची दखल घेतली जात असताना आंबेगावच्या पूर्व भागातील पाणीटंचाई व शेतीची बिकट परिस्थिती दुर्लक्षित का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. घोडनदीचा पुरेसा लाभ नाही, डिंभे उजव्या कालव्याचे पाणी नाही आणि शेती पावसावर अवलंबून आहे; मग या गावांच्या दुष्काळी परिस्थितीची दखल कधी घेतली जाणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शासनाने पूर्व आंबेगावातील संबंधित गावांचे तातडीने गावनिहाय वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करावी आणि पात्र गावांना दुष्काळी सवलतींचा लाभ द्यावा, तसेच पूर्व भागातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ठोस जलसिंचन योजना राबवावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन लवकरच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात येणार असल्याचे पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर यांनी सांगितले.

चौकट

माझ्या जारकरवाडी पंचायत समिती गणातील पहाडदरा, शिरदाळे, धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी ही गावे दुष्काळग्रस्त असून येथील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे या भागात चालू वर्षी पाऊस अत्यल्प प्रमाणात झाला आहे.

राज्य सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावे जाहीर केली आहे त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे नाव नाही परंतु पूर्व भागातील वरील प्रमाणे गावे ही दुष्काळग्रस्त आहे या गावांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळावा
अशा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हा अधिकारी जितेंद्र दुडी यांना देणार आहे.

कु.‌ अंकिता वाळुंज – पंचायत समिती सदस्या आंबेगाव.

Related Articles

ताज्या बातम्या