spot_img
spot_img
spot_img

पोंदेवाडी मार्गे एसटी बस सेवा तातडीने सुरू करा; ग्रामस्थांची मागणी

मंचर प्रतिनिधी 

पोंदेवाडी, ता. आंबेगाव (प्रतिनिधी): पोंदेवाडी मार्गे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून काठापूर बुद्रुक ते पोंदेवाडी या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पोंदेवाडी फाटा ते पोंदेवाडी गाव हा मार्ग अनेक दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परिणामी, या मार्गावरील एसटी बस सेवा बंद झाली होती.
एसटी सेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच रोजच्या प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवांसाठीही नागरिकांची गैरसोय झाली असून खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागले.

आता रस्त्याचे काम पूर्ण होऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे पोंदेवाडी मार्गे ‘लाल परी’ची सेवा तात्काळ सुरू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. एसटी बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले. त्यांनी संबंधित प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन पोंदेवाडी मार्गे एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

चौकट
दळणवळण सुलभ व्हावे यासाठी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी काठापूर बुद्रुक ते पोंदेवाडी सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये निधी मंजूर केला होता सदर रस्ताचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे पोंदेवाडी लोणी एसटी सेवा रस्त्या अभावी बंद झाली आहे एसटी बस सेवा पूर्ववत करण्यासाठी लवकरच पत्र व्यवहार करणार आहे.

अंकिता वाळुंज पंचायत समिती सदस्या आंबेगाव.

Related Articles

ताज्या बातम्या