spot_img
spot_img
spot_img

१५ फेब्रुवारीला शिवनेरी मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूं होणार सहभागी शिवनेरी पायथ्याशी होणार जल्लोष

१५ फेब्रुवारीला शिवनेरी मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूं होणार सहभागी शिवनेरी पायथ्याशी होणार जल्लोष

जुन्नर, प्रतिनिधी

शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, मोरडे फूड्स व पोल्ट्री ब्रिडर्स कोऑर्डिनेशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील ‘शिवनेरी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मॅरेथॉनचे चौथे वर्ष असून देश-विदेशातील तीन हजारांहून अधिक धावपटू यात सहभागी होणार आहेत.

केनियाच्या धावपटूंचा संघ हे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची माहिती शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी दिली.
५, १० व २१.१ किलोमीटर अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. शिवजयंतीच्या आदल्या रविवारी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या मॅरेथॉनला यंदा उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांचा सक्रिय सहभाग लाभला आहे.

मोरडे फूड्स, वेकिज, शिवाई देवी मंदिर ट्रस्ट तसेच कुसूर, वडज, पारुंडे व काटेडे ग्रामपंचायतींसह आरोग्य विभाग, वन विभाग, तहसील कार्यालय, पोलिस प्रशासन, जुन्नर पंचायत समिती व नगर परिषद यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
१५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून धावपटू शिवनेरी पायथ्याशी दाखल होण्यास सुरुवात करतील. झुंबा, पारंपरिक ढोल-झांज वादनाने वातावरण भारावून जाईल. सकाळी ६.१५ वाजता भगव्या झेंड्याने स्पर्धेला सुरुवात होईल.

लोकनेते, वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी उपस्थित राहणार आहेत ऐतिहासिक परिसरातून स्पर्धा मार्ग
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून स्पर्धेला प्रारंभ असून कुसूर–तलाखी–वडज–पारुंडे–काटेडे असा मार्ग असणार आहे.

सर्व गटांच्या शर्यतींचा प्रारंभ व समारोप कुसूर येथील दत्त मंदिरासमोरील मैदानात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ज्या परिसरात गेले, त्या ऐतिहासिक व निसर्गरम्य वातावरणातून धावण्याची संधी सहभागी धावपटूंना मिळणार आहे.

धावपटूंना विविध सुविधा
स्पर्धा मार्गावर झुंबा, पारंपरिक लोकवाद्य, नाश्ता, पाणी व एनर्जी ड्रिंक, द्राक्षे, संत्री, अंजीर, चिक्की आदी पोषणपूरक पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रथमोपचार, फिजिओथेरपी, कार्डियाक रुग्णवाहिका, फिरती शौचालये आदी सुविधा उपलब्ध असतील. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दुतर्फा मशालींच्या प्रकाशात उजळलेला स्पर्धामार्ग हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

शिवनेरीच्या पायथ्याशी होणाऱ्या या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शिवजयंती महोत्सवात यंदा क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या