Home गावागावातुन दुष्काळाने नर्सरी व्यवसायाचेही कंबरडे मोडले

दुष्काळाने नर्सरी व्यवसायाचेही कंबरडे मोडले

0

 

मंचर प्रतिनिधी

पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका आता शेतीपूरक व्यवसायांनाही बसू लागला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील नर्सरी व्यवसायावर दुष्काळाचे सावट पसरले असून, रोपांच्या मागणीत घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने नर्सरी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांपाठोपाठ आता नर्सरी व्यावसायिकांनाही दुष्काळाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला तसेच वेलवर्गीय पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे दरवर्षी नर्सरीमधील विविध प्रकारच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, चालू वर्षी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने अनेक भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, पाण्याची उपलब्धता आणि पिकांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता वाढल्याने शेतकरी लागवडीबाबत सावध भूमिका घेत आहेत.

शेतकऱ्यांकडून रोपांची मागणी कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम नर्सरी व्यवसायावर होणार आहे. रोपांची निर्मिती, बियाणे, खते, औषधे, पाणीपुरवठा व्यवस्था आणि कामगारांवर व्यावसायिकांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च आधीच करून ठेवलेला असताना रोपांची विक्री अपेक्षेप्रमाणे न झाल्यास गुंतवलेले भांडवल अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.

नर्सरी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनू शकतो. रोपांची मागणी घटल्यास कामाचे प्रमाण कमी होऊन कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता शेतीशी संबंधित विविध व्यवसायांवरही होत असल्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

एकीकडे पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना रोपे पुरविणारा नर्सरी व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नर्सरी व्यवसायांचे आर्थिक गणितही बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.

शाम बढेकर माऊली हायटेक नर्सरी जारकरवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here