मंचर प्रतिनिधी
मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. सद्यस्थितीत मांदळेवाडी गावाला शिरूर तालुक्यातून वीजपुरवठा केला जात असल्याने संबंधित ठिकाणी होणाऱ्या लोडशेडिंगचा परिणाम गावावर होत होता.
विशेषतः दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते.
मांदळेवाडी गावाचा वीजपुरवठा आंबेगाव तालुक्यातील लोणी उपकेंद्रातून करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती.
या मागणीसाठी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
या प्रयत्नांना यश मिळाले असून वडगावपीर येथून मांदळेवाडीपर्यंत नवीन उच्चदाब वीजवाहिनी (एचटी लाईन) टाकण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. सुमारे ५० पोल उभारून ही वीजवाहिनी उभारण्यात येणार असून या कामासाठी अंदाजे २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महावितरणच्या मंचर विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आले असून नुकतेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम भूमिपूजन प्रसंगी पंचायत समिती सदस्या अंकिता अनिल वाळुंज, संविदने गावचे माजी सरपंच वसंत पडवळ, मांदळेवाडी सरपंच उज्वला आदक, धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव पाटील, विजय आदक, उद्योजक चेतन पडवळ, बाळशीराम वाळुंज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





