मंचर (प्रतिनिधी) : ग्रामीण महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योजकता विकास संस्थान (EDII), अहमदाबाद यांच्या पुढाकारातून आयोजित २० दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास (एमएसडीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिला उद्योजिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
भारतीय उद्योजकता विकास संस्था आणि अॅक्सेंचर यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी विविध व्यावहारिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान ‘Agro Millets and Food Processing’ विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि व्यवसाय व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नंदा काळे, माजी सदस्य गणेश वाघमारे, महेश वाघमारे, उमेदचे ग्रामसंघ सचिव सारिका घोडेकर, सीआरपी हेमलता घोडेकर, प्रशिक्षक तृप्ती बोरा तसेच संस्थेचे विकास गोफणे व रजनी मिरके उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण महिलांनी उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वउद्योग उभारावा आणि कुटुंब तसेच समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.





