मंचर प्रतिनिधी
मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील उद्योजिका ज्योती अरुण गोरडे यांना युगप्रवर्तक प्रतिष्ठान, घोडेगाव (ता. आंबेगाव) यांच्यातर्फे ‘स्वामी विवेकानंद युवा उद्योजक’ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिव्यांगांचे पुनर्वसन, तळागाळातील वंचित समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी केलेले भरीव कार्य, निराधार व विधवा महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देणे, दिव्यांगांसाठी शस्त्रक्रिया, श्रावणबाळ योजना, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, दिव्यांगांना प्रमाणपत्रे व सवलतीचे पास उपलब्ध करून देणे, मानधन व बचत गटांसाठी काम करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच आपल्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.
समाजासाठी निरपेक्ष भावनेने, कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेल्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
‘स्वामी विवेकानंद युवा उद्योजक’ हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन युगप्रवर्तक प्रतिष्ठान, घोडेगाव यांनी माझा मोठा सन्मान केला आहे, अशी भावना ज्योती गोरडे यांनी व्यक्त केली.





