शिर्डी (प्रतिनिधी) : इफको या जगातील अग्रगण्य शेतकरी सहकारी संस्थेच्या संचालक पदासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर करून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी पद मिळवले असल्याचा गंभीर आरोप सहकार भारतीचे प्रदेश सचिव व इफकोचे जनरल बॉडी सदस्य नकुल कडू यांनी केला आहे. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र, तेलंगणा आणि गोवा या राज्यांतून इफकोच्या जनरल बॉडी सदस्यांची निवड होते. या निवडणुकीत खोट्या कागदपत्रांच्या आधारे ठराव सादर करून विवेक कोल्हे यांनी जनरल बॉडी सदस्य पद मिळवले, असा आरोप नकुल कडू यांनी केला आहे.
इफको संचालक मंडळाच्या निवडणुकी संदर्भातील प्रकरण सध्या केंद्रीय निबंधकांमार्फत लवादासमोर सुनावणीला आहे.
या सुनावनीवेळी काही कागदपत्रांची पडताळणी करताना ही गंभीर बाब उघडकीस आल्याचे नकुल कडू यांनी सांगितले. विवेक कोल्हे यांनी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ, कोपरगाव या संस्थेच्या माध्यमातून इफकोच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र संबंधित संघाच्या संचालक मंडळात ते निवडून आलेले संचालक नाहीत, चेअरमनही नाहीत अथवा व्यवस्थापकीय संचालकही नाहीत अशा प्रकारची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आल्याचा दावा नकुल कडू यांनी केला आहे.
मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट २००२ व इफकोच्या निवडणूक नियमांनुसार ज्या संस्थेच्या वतीने प्रतिनिधित्व करायचे आहे, त्या संस्थेचे चेअरमन किंवा निवडून आलेले संचालक असणे बंधनकारक असते. मात्र या अटींची पूर्तता न करता खोटी माहिती व ठराव सादर करून विवेक कोल्हे यांनी संचालक पद मिळवले, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
या प्रकरणी केंद्रीय सहकार निवडणूक आयोगाचे अध्यक्ष तसेच इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याचे नकुल कडू यांनी सांगितले. या तक्रारीवर लवकरच कारवाई होऊन विवेक कोल्हे यांचे जनरल बॉडी सदस्यत्व रद्द होईल व त्यानंतर संचालक पदही आपोआप रद्द होईल, असा दावा पत्रकार परिषदेत नकुल कडू यांनी केला आहे.
इफकोच्या संचालक पदावरुन विवेक कोल्हे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे कोपरगावचे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार असुन या आरोपांना विवेक कोल्हे काय उत्तर देणार याबाबत कोपरगावच्या जनतेला उत्सुकता लागली आहे.





