spot_img
spot_img
spot_img

नागापूर येथे बिबटचा बछडा जेरबंद

 

वळती  प्रतिनिधी  ( विलास भोर )

नागापूर ( ता . आंबेगाव ) येथे बुधवार (दि. २५) पहाटे बिबटचा बछडा जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
मागील दोन महिन्यांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटचा बछडा अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. याच ठिकाणी दहा दिवसांपूर्वी बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली होती
नागापूर गावातील पश्चिमेला पवार मळा येथील शेतकरी रघुनाथ रामहरी पवार यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. नागापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने वनविभागाने एकूण तीन ठिकाणी पिंजरे बसवले होते. त्यापैकी पवार मळ्यातील पिंजऱ्यात बुधवारी बिबटचा बछडा अडकला.

शेतकरी रघुनाथ पवार हे सकाळी शेतात गेले असता त्यांना पिंजऱ्यात बिबटचा बछडा जेरबंद झाल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील उपसरपंच सुनील शिंदे यांना दिली. सरपंचांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवली.
मंचर वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी विकास भोसले, वन परिमंडल अधिकारी आर. एम. फुलमाळी यांच्या सूचनेनुसार वनरक्षक बालाजी पोतरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आवश्यक खबरदारी घेत बिबट बछडा सुरक्षित ताब्यात घेतला.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या बछडा मादीची वैद्यकीय तपासणी करून तिला जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात येणार आहे.

ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात न जाणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे तसेच जनावरांची सुरक्षित व्यवस्था करावी, असे आवाहन मंचर वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी केले आहे.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या