spot_img
spot_img
spot_img

रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे कनिष्ठ महाविद्यालयाला ‘अ+’ श्रेणीचा बहुमान

 

मंचर प्रतिनिधी

 

रयत शिक्षण संस्था संचलित अण्णासाहेब आवटे कनिष्ठ महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित करत ‘अ+’ श्रेणी मिळवली आहे. महाराष्ट्र शासन मार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (स्क्वाफ)’ या प्रक्रियेत ही कामगिरी नोंदविण्यात आली.

 

राज्यातील १,०२,६७५ शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये स्वयं मूल्यांकन केले होते. त्यापैकी बाह्य मूल्यांकनासाठी निवड झालेल्या १०,७१२ शाळांमधून केवळ ४२९ शाळांना ‘अ+’ हा सर्वोच्च दर्जा प्राप्त झाला. पश्चिम विभागातून शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर ठरलेल्या मंचर येथील अण्णासाहेब आवटे कनिष्ठ महाविद्यालयाचा या यादीत समावेश झाल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

 

शासकीय आदेशानुसार आता महाविद्यालयाला आपल्या लेटरहेड तसेच दर्शनी भागावर ‘अ+’ श्रेणीचा उल्लेख करण्याचा मान मिळाला आहे.

या यशाबद्दल प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. बदलत्या काळानुसार शिक्षकांनीही स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

“विद्यार्थ्यांसमोर आणि शिक्षकांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यामुळे केवळ खडू-फळ्यापुरते मर्यादित न राहता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थी-केंद्रित नवी शैक्षणिक परिसंस्था उभारणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

 

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील सक्षम विद्यार्थी घडविण्याचे काम संस्था करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढेही शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महाविद्यालय कसोशीने प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

या प्रसंगी गुणवत्तापूर्ण कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नामदेव भोर यांनी केले, तर आभार प्रा. एन. एस. गायकवाड यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या